डिसेंबर २०१९ मधेच Coronaच्या बातम्या येऊ लागल्या. फेब्रुवारी महिन्यात भारतातून सुट्ट्या संपवून युरोपात परत येतानाच एअरपोर्टवर काही जण मास्क लावून होते, तेव्हाच मला प्रश्न पडला,’बापरे, ह्यांची मास्क मध्ये घुसमट कशी होत नाही?’ तेव्हा युरोपमध्ये covidची सुरुवात होत होती आणि भारतात तर covidचा फारसा पत्ता नव्हता. फेब्रुवारीमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळाल्याने माझ्या Frankfurtला दर आठवड्याला वाऱ्या सुरु झाल्या आणि इथे covidने जोम धरायला सुरवात केली. मी प्रवास करत्ये बघून मला आणि घरच्यांना थोडी काळजी वाटू लागली. Covidचा वाढता आकडा पाहून मला Frankfurtला जायची अजिबात इच्छा नसे. त्यातच जर्मन सरकारने औषध किंवा लस उपलबद्ध नाही म्हणून लोकांना घरात थांबण्याचे आव्हान केले. कित्येक वर्षांनी पहिल्यांदा चॅन्सलर ऑफ जर्मनी अँगेला मर्केल ह्यांनी देशवासियांना संबोधिले. ‘आता आपलेच वागणे हेच सगळ्यात मोठे औषध’ असे संबोधून त्यांनी लोकांना social distancingपाळण्याचे आव्हान केले.कठीण परिस्थितीतसुद्धा त्यांचे शांत स्वरातले तर्कसुसंगत,वास्तवाधारित भाषण ऐकताना त्यांच्याबद्दल असलेला आदर अजूनच वाढला.
आता मी दररोज बातम्या,Covid स्टॅटिस्टिकस, Indian embassy in Germany व मराठी कट्टा जर्मनीवर येणारे updates बघत होती. दररोजचे ते बदलणारे ग्राफ्स आणि नंबर्स बघतानाच काही भारतीय न्यूस चॅनेल्स वर युरोपातल्या येणाऱ्या काही चुकीच्या बातम्या, whatsapp forwards ह्यांनी घरच्याना वाटणारी काळजी बघून मग घरी सगळ्याच बातम्यांवर विश्वास ठेवू नका हे आधी सांगितले. एकतर भारताला जाणारी विमानसेवा बंद झाल्याने आपण दुसऱ्या देशात अडकलोय अशीही थोडी भीती वाटली. स्पेन आणि इटलीच्या मागोमाग जर्मनीतही रुग्णसंख्या वाढत होती. तरीपण काही रुग्ण उपचारासाठी इटली आणि स्पेनमधून जर्मनीमध्ये आणले जात असल्याच्या बातम्या होत्या. त्यामुळे इथे पुरेशा मेडिकल सोयी असाव्यात असे अनुमान काढून मी दिलासा दिला. ओळखीतल्या काहीना kurzarbeit (म्हणजे ५०-६०% काम करून तेवढा पगार) चालू झाला. काहींना जॉब ऑफर असूनही काम चालू करण्याच्या तारखा उशिराने देण्यात आल्या. तर काही भारतात सुट्टीसाठी गेलेले , तिथेच अडकले तर काही इथे एकटे होते म्हणून स्वतःहून स्वदेशी परतले. त्यामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात ह्या Covidने ढवळाढवळ केली आणि ह्या सूक्ष्म विषाणूने दिलेल्या मोठ्या धक्क्याने सगळ्यांचीच गणिते बदलली. जर्मनीने एक देश म्हणून विविध उपाययोजना करत Covidचा जसा सामना केला आणि जगभरात त्याचे कौतुक झाले हे इथल्या प्रशासनाचे यश म्हणावे लागेल.
इथे म्हणावे तर पूर्ण किंवा कडक lockdown झाले नाही.पण युरोपातल्या युरोपात देशांच्या सीमा बंद होण्याची ही आता पहिलीच वेळ होती, त्यामुळे माझ्यापेक्षा वयानं मोठे आणि खूप वर्ष इथे राहणाऱ्या मित्र-परिवाराला मात्र चुकल्यासारखे होत असल्याचे लक्षात आले. सुरुवातीला लोकांनी घाबरून टॉयलेट पेपर्स, ग्रोसरीस जमा करायला सुरुवात केल्याने सुपरमार्केटमध्ये काही गोष्टींचा तुटवडा दिसत होता.पण जीवनावश्यक गोष्टींची कमी होणार नाही अशी हमी मिळाल्यावर लोक शांत झाले. ट्रेन्स,बसेस म्हणा किंवा मेडिकल, सुपर मार्केट अशा सगळ्या सोयी उपलबध होत्या. फक्त सुपर मार्केटच्या वेळा २-3 तासाने कमी झाल्या होत्या आणि काही जागी ट्रेन्स-बसेस पण सुटीच्या दिवसांच्या वेळापत्रकाप्रमाणे चालू होत्या.बाहेर जायला फार बंधनं लादलेली नव्हती पण नंतर एका कुटुंबात नसलेल्या २पेक्षा जास्त लोकांनी बाहेर एकत्र भेटायला काही दिवस बंदी होती.तर एकूणच,काही तुरळक घटना वगळता इथे लोकांच्या शिस्तीमुळे, प्रशासनावर असणाऱ्या त्यांच्या विश्वासामुळे आणि वेळेत प्रशासनाने घातलेले नियम पाळल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. लोकांनी स्वतःसाठी केलेला Lockdown यशस्वी झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ह्या काळात माझे आणि माझ्या नवऱ्याचे परत वर्क फॉर्म होम चालू झाले. माझ्या ऑफिसमध्ये कित्येकांना हे आव्हान वाटले म्हणून online coffe/beer, lunch parties, online ऑफिस kitchen आणि गप्पा असे ग्रुप्स तयार झाले. पण आम्हाला आधीच वर्क फॉर्म होमची सवय असल्याने परत आधीच्या routineमध्ये आल्यासारखं वाटलं. मग एका रूम मध्ये तो आणि एकात मी असं आमच्या घराचं २ ऑफिस रूम मध्ये रूपांतर झाला. कधी मीटिंग नसतील तेव्हा आम्ही आमच्या dining/work table वर आजूबाजूला बसून जर्मनमध्ये बोलून ऑफिसचा फील घेत असू.दुपारी जेवायला एकत्र ब्रेक घेत असू. म्हणावं तर दिनचर्या फार बदललेली नव्हती, फक्त आता चालायलाही बाहेर जायला नकोसे वाटे मग आम्ही घरातच सगळ्या खोल्यांतून चालत आमचे पायी चालणे मोजत असू. हे घरात चालणं आमच्यासाठी नवीन होतं आणि इथे येऊन असं घरी बसावं लागेल असं कधी वाटलं पण नव्हतं. शनिवारी सुपरमार्केटला जाऊन सामान आणणे एवढच काय ते बाहेर जात असू.
मी राहत असणाऱ्या, डुईसबुर्ग शहर ज्या राज्यात आहे, त्या North Rhine Westphalia जर्मन राज्यात सुरुवातीला सगळ्यात जास्त रुग्ण असल्याने रस्त्यावर किंवा चौकात बऱ्यापैकी शुकशुकाट असे. आधीच शांत असणाऱ्या ह्या शहरात अजून निर्माण झालेली शांतता नकोशी वाटे. मार्च एप्रिल मध्ये तर सिटी सेंटरजवळ राहूनही सिटी सेंटर शनिवार रविवार असून पण ओसाड होते.रस्त्यावरून चालतानाही लोक एकमेकांपासून अंतर ठेवून चालू पाहत होते.आणि इतर वेळी घराजवळ असणारे इव्हनिंग हॉटस्पॉट्स,कॅफेस, बिअर बार्स, मॉल्स पण आता चक्क बंद झाल्याने शहरातला जिवंतपणा नाहीसा झाल्यासारखे वाटू लागले होते.
घरी वेळ घालवायला म्हणून साफसफाई , मग निरनिराळे पदार्थ बनवणे, घरच्या घरीच विविध झाडे लावणे, दररोज संध्याकाळी जर्मन भाषाभ्यास आणि कधीतरी योगाभ्यास, संस्कृत भाषाभ्यास असे छंद जडले. खूप दिवसांपासून वाचू वाचू म्हणत धूळ खात पडलेली माझी किंडल, मी पुन्हा पुस्तक वाचायला वापरू लागले.बरच काही लिखाण बाकी होतं, ते साधायचा प्रयत्न केला. माझ्या जुन्या कथा कविता वाचून त्यात रमायला वेळ मिळाला. काही जागा, museumsसुद्धा online फिरले. online चाललेली निरनिराळी challenges पाहून ते करायचा प्रयत्न केला पण मला काही ते जमलं नाही. lockdown मुळे मित्रांनापण भेटणे बंद झाल्याने जवळ राहूनही आता ऑनलाइनच गप्पा, चर्चा कराव्या लागत होत्या. काही नवे -जुने सिनेमे, नेटफ्लिक्सवरच्या सिरिअल्स ह्या सगळ्यांचा आम्ही दोघांनी फडशा पडला.
अशा दिनचर्येची सवय होत आता ३-४ महिने झाले आणि गोष्टी परत new-नॉर्मल म्हणत सुरु झाल्या आहेत. ऑफिस मध्ये आता २ गट करून आठवडे आलटून पालटून जाण्याची परवानगी आहे.आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत्ये आणि गोष्टी पण पूर्ववत होतायत. दररोज मिळणाऱ्या रुग्ण संख्येचा आकडा स्थिरावतोय. सरकारने दिलेल्या सोयी-सुविधांमुळे उद्योगधंदे परत पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करतायत.ऑफिसेस, मॉल्स , सुपर मार्केट्स सगळं काही चालू होतंय फक्त मास्क, sanitizers आणि social distancingसकट..तरी अजून आपण काळजी घ्यायलाच हवी. Covid चा आकडा कमी झालाय तो गेलेला नाहीये हे लक्षात ठेऊन, social distancing पाळत थोडंसं संयमाने सामोरं जायला हवं. हा एक स्वल्पविराम होता, थोडंसं थांबून कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळालेला आराम होता असं मानून लवकरच हा रोग नाहीसा होईल, त्यावर काही उपचार येईल अशी आशा करूया आणि सध्या तरी आपण काळजी घेऊया.
--- चैताली पाटील
Duisburg , NRW,Germany