ePrivacy and GPDR Cookie Consent Script by Cookie Consent

जर्मनीतील लॉकडाऊनचे अनुभव - सचिन जोशी (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

जर्मनीतील लॉकडाऊनचे अनुभव - सचिन जोशी (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

नमस्कार मंडळी. आम्हाला सगळ्यांना म्हणजे मी, माझी पत्नी सौ. प्रगती आणि आमचा मुलगा कु. मृण्मय ह्यांना "कोरोना" म्हणज़ेच "कोविड -१९" ह्या विषाणू चा आणि त्याबद्दल असलेल्या "भीती" किंवा "उपचारां" चा बराच जवळून अनुभव आला.

झाले असे, कि आम्ही तिघे आधीच ठरल्या प्रमाणे "इटली" च्या "रोम" ह्या शहरात फिरायला गेलो होतो आणि त्या वेळेस म्हणजेच, फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यात "कोरोना" ची भीती किंवा दहशत पसरली नव्हती आणि आम्ही सुद्धा त्याचा काहीही विचार न करता गेलो.

ठरल्याप्रमाणे म्हणजे २१ फेब्रुवारी ला "फ्रॅंकफुर्ट" च्या विमानतळाहून सर्व सोपस्कार पार पडून निघालो आणि "रोम" ला पोहचलो. तेथे गेल्यावर मात्र  विमानतळातुन बाहेर पडताना अगदी "डोळ्यावरचा चष्मा" काढून आमचे "थर्मल स्कॅनिंग" झाले आणि आम्हाला "कोरोना" विषयी थोडा "सेरिअसनेस" आला. पण मग आम्ही आमच्या "प्लॅन" प्रमाणे संपूर्ण "रोम" बघितलं आणि शेवटच्या दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारी ला आम्हाला "फेसबुक" वर लोकांच्या "पोस्ट्स" दिसायला लागल्या आणि आम्ही जरा घाबरून गेलो कारण बातम्या ह्या "इटली" च्या "मिलान" आणि "व्हेनिस" ह्या शहरातून येत होत्या. म्हणून आम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारी ला बाहेर सुध्दा गेलो नाही.

आमच्या मनात पहिला विचार आला कि आपल्याला आणि खास करून मृण्मय ला "संसर्ग" झाला म्हणजे? किंवा काही झालं नाही पण इकडंन जाऊ दिल नाही तर राहायचं कुठे आणि आपल्या (पत्नीच्या) "जॉब" चे काय? एक ना शम्भर असे सर्व प्रश्न डोक्यात घोळ घालत राहिले. पण तो पर्यंत "रोम" मध्ये एक हि "पेशंट" नव्हता किंवा तशी बातमी नव्हती आणि "रोम" अजून सुरळीत सुरु होते हि एकच गोष्ट मनाला दिलासा देत होती. शेवटी २६ फेब्रुवारी ला सकाळी लवकर टॅक्सी ने विमान तळाकडे निघालो खरे पण जाऊ देतील कि नाही हेच डोक्यात सारखे घोळत होते. पण आमचे नेहमीप्रमाणे चेकिंग करून आम्ही बोर्ड केलं आणि "फ्रॅंकफुर्ट" ला परतलो. इकडे बाहेर पडताना चेकिंग वगैरे काही झाले नाही आणि आम्ही सुटकेचा श्वास घेतला.

दुसऱ्या दिवशी मृण्मय किंडरगार्टन ला गेला खरा पण अगदी दरवाज्यात च आम्हाला थांबवून विचारले कि काही ताप वगैरे नाही ना? तुम्ही "इटली" हुन आला आहात तर आम्ही मुलाला घेणार नाहीत वगैरे सांगितले आणि फॅमिली डॉक्टर शी बोलायला लावले. तसेच "Gesundheitsarmt" ला फोन करून सुद्धा "कन्फर्म" केले आणि शेवटी मृण्मय ला मध्ये घेतले.

त्या नंतर साधारण चौथ्या दिवशी मृण्मय ला ताप आला आणि आम्ही पुन्हा घाबरलो. "चाईल्ड स्पेसिऍलिस्ट" कडे त्याला घेऊन गेलो तर "रिसेप्शनिस्ट" ने त्याला घ्यायला नकार दिला. मग तेथून च आम्ही "Gesundheitsarmt" च्या डॉक्टर्स शी बोललो. त्यांनी सर्व ऐकून घेतले आणि "तुम्ही साऊथ इटली ला होतात त्यामुळे संसर्ग नसेल आणि तशी लक्षणे पण तुम्हा तिघांना नाहीत" म्हणून तुमच्या "चाईल्ड स्पेशलिस्ट" ने त्याला घ्यायला च पाहिजे असे आवर्जून सांगितले. मग पुन्हा आम्ही "चाईल्ड स्पेशालिस्ट" शी बोललो आणि अखेर मृण्मय ची ट्रीटमेंट सुरु झाली. त्याचे टेम्परेचर घेतले, घसा बघितला, युरीन टेस्ट झाली, मेडिसिन्स दिल्या आणि तीन दिवसांनी पुन्हा यायला सांगितले. पण अचानक दुसऱ्या दिवशी त्याला १०४ ताप आला आणि पुन्हा डॉक्टर कडे घेऊन जावे लागले. असेच पुढचे दोन ते तीन दिवस फारच कठीण गेले पण डॉक्टर नी फार धीर दिला आणि बाकीचे काहीच लक्षणे नसल्याने "काळजी करण्या सारखे काहीहि नाही" असे सांगितले आणि आमचा जीव भांड्यात पडला. शेवटी आम्हा तिघांना पाठीला स्टेथेसस्कॉप लावून आमच्या फुफ्फुसाची तपासणी करून बाकीची लक्षणे नसल्यामुळे, सतर्कता म्हंणून १५ दिवस "होम क्वारंटाईन" करायला सांगितले. तीन ते चार दिवसांनी मृण्मय पूर्ण बरा झाला आणि आम्हाला हायसे वाटले. त्या दरम्यान प्रगती च्या कंपनी ने पण तिला दोन आठवडे "होम क्वारंटाईन" आणि "होमी ऑफिस" करायला सांगितले आणि मग पुढचे १५ दिवस घरी अगदी आरामात आणि मजेत गेले.

आम्हा तिघांना "असा" वेळ बऱ्याच वर्षात मिळाला नव्हता आणि आम्ही तो भरभरून एन्जॉय करत होतो. खास करून मृण्मय साठी मराठी चित्रपट आम्ही शोधून ठेवत होतो आणि रात्री बघत होतो. त्यातल्या त्यात "भाई: व्यक्ती आणि वल्ली", "आनंदी गोपाळ" असे चित्रपट बघितले. महाभारत पूर्ण बघून झाले, रामायणाच्या गोष्टी सांगून झाल्या आणि मुख्य म्हणजे आपल्या "मराठी कट्टा जर्मनी" च्या "मराठी शाळेचे" पूर्ण गृहपाठ करून झाले. मराठी ची  "स्वर आणि व्यंजनाची" उजळणी झाली. त्याला मराठी शाळेच्या अभ्यासामुळे मराठी वाचायला यायला लागले हा एक आनंदाचा भाग होता आणि आज हि आहे.

आमच्या बाजूच्या इमारतीच्या तळ मजल्यावर एक जर्मन आजी राहतात. त्यांची आणि मृण्मय ची चांगलीच गट्टी जमल्यामुळे त्यांनी त्याच्या वाढदिवसाला १५०० टाईल्स वाले एक "पझल" गिफ्ट दिले होते. रोज २ ते ३ तास आम्ही तिघे मिळून ते "पझल" सोडवत होतो आणि एकूण १ ते दीड महिना आम्ही त्यात मस्त वेळ घालवला आणि ते "पझल" पूर्ण केले.

मृण्मय ला "अंतराळ" ह्या विषयात फार रस असल्यामुळे रोज दहा ते पंधरा मिनिटांचा "स्पेस" वरचा एक तरी विडिओ "यु ट्यूब" वर बघणे होत होते. मग त्यात भारताचे "चांद्रयान" असो किंवा "नासा" आणि "स्पेस-एक्स" चे "मंगळ मिशन" असो ते बघून त्या वरची प्रश्नोत्तरे चालत होती. "इंटरनॅशनल स्पेस स्टेशन" ची उभारणी कशी केली, त्यातले "अस्ट्रॉनॉट्स" श्वास कसा घेतात हे हि बघून आणि समजून घेणे झाले.

"लॉकडाऊन" शिथिल असल्यामुळे (लोकसंख्या कमी आणि शिस्त प्रिय जनता) आम्ही सगळे, योग्य खबरदारी घेऊन बाहेर जाऊ शकत होतो. त्यामुळे मृण्मय ला सायकल शिकवून झाले. जवळच्या सुपर शॉप्स म्हणजे "काऊफलँड " किना "रेवे" मध्ये शॉपिंग चालूच होते. फक्त घरातील एक च माणूस (मोस्टली मी च) खरेदीला बाहेर जात होतो. एक ते दीड मीटर्स चे अंतर ठेवून आणि मास्क वापरून अगदी आरामात जीवनमान सुरु होते. संध्याकाळी बाहेरून आल्यावर सरळ आंघोळीला जाणे हा "शिरस्ता" आधी हि होताच पण ह्या काळात जास्त "सिरिअसली" पाळत होतो.

प्रगती ने बरेच नवनवीन पदार्थ करून खाऊ घातले. त्यात अगदी "अवोकाडो चे सँडविच" आणि  "थाय  करी" पण होती. मग एक कल्पना सुचली. जर्मन माणसांना आपले भारतीय पदार्थ कळावेत आणि त्यांनीही ते आवडीने खावेत, म्हणून आम्ही "मृदा'स डेलिकसीस" हा "यु ट्यूब चॅनल" सुरु केला. विडिओ बनवून एडिट करून अपलोड करणे शिकलो आणि त्यात पुढे अजून काय काय करू शकतो ह्या वर विचार हि झाला. ह्या लॉक डाऊन मुळे आम्हाला तिघांना भरपूर वेळ मिळाला हे खरेच पण "पाक" कलेचा आमचा छंद (होय, मला (आधी मजबुरी म्हणून आणि आता आवडते म्हणून) आणि मृण्मय ला स्वयंपाकाची आवड आहे)  पुन्हा जोपासला गेला आणि त्यामुळे एक "नवीन उपक्रम" पण सुरु झाला.

भारतात सर्व नातेवाईकांशी गप्पा मारणे तर सुरु होतेच पण एकूण जगात जे झाले त्या विषयी चर्चा पण होत होती. एक मात्र खर कि ह्या "कोरोना" व झालेल्या "लॉक डाउन" मुळे "आहे त्यात भागवणे" पुन्हा एकदा शिकलो, मुलाला हि शिकविले आणि त्याचे महत्व त्याला हि कळले.

बाकी, जगात काय चालू आहे त्या वर आपली सर्वांची नजर असेलच पण ह्यातून "मनुष्य" पुन्हा सावरेल, जग लवकरच "पूर्वीसारखे" होईल अशी आशा ठेवूया आणि "पुनःश्च हरी ओम" म्हणत छान जगूया, नाही का??

Dr. Sachin A. Joshi
Hanau, Germany
(sachinaj2007@gmail.com)

Show Comments