रोज गाणी ऐकत व निसर्ग पहात ऑफिस ला जात होते. खूप जास्त कामात रमले होते. मुले मोठी झालीत तेंव्हा परत १५ वर्षांनंतर स्वतःच्या श्रेत्रात जर्मनभाषेतून शिक्षण घेऊन मी गेली ३ वर्ष पर्यटन श्रेत्रातील नोकरीला लागले होते.
मार्च महिन्यात करोनाचे वेगवेगळे परीणाम जसे जर्मनीत दिसायला लागले, तसेच त्याचे एक रूप अर्थातच पर्यटन क्षेश्रालाही दिसलेच. बरोबर माझ्या वाढदिवसाला मला शुभेच्छा देण्यासाठी मला वरिष्ठांनी फोन केला आणि त्याच बरोबर माझी नोकरी ह्याच व्हायरसच्या मुळे गेली हा निरोपही दिला.
माझी वाचाच जणू बंद झाली/हरवली - डोळ्या समोर मी केलेला अभ्यास, नोकरी मिळणे आणि त्यातील रम्य क्षण चित्रपट पाहिल्या सारखे दिसू लागले. पण मग विचार केला - ह्या वादळाने जगभरातच गोंधळ घातला आहे. असो; नोकरी गेली - माझी हिम्मत नाही!
नवऱ्याला ऑफिस जाणे जरूरी होते, मुले शाळा/विद्यापीठाच्या कामात रमलेली होती. मी माझे लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे केंद्रीत करू लागले कारण पुढच्या अध्याया कडे मला पाऊल उचलायचे होते. आर्ट ऑफ लिव्हिंग च्या ऑनलाईन कोर्स वर माझी नजर गेली. सुदर्शन क्रिया शिकवणारा हा हॅपिनेस कोर्स करून पहावा असे वाटले. ५ दिवसांचा हा कोर्स करतांना मन मनःशांती जाणवली. रोज नियमितपणे सकाळी करावेसे वाटले - म्हणून करू लागले. ह्याच दरम्यान आपल्या (जर्मनीच्या) दुपारच्या वेळी ऑनलाईनच एक पॉवर योगाच्या ग्रुप मध्ये सहभागी झाले. मानसिक स्वास्था बरोबर शारीरिक व्यायामाचिही जोड मिळाली. सुयोगाने त्याच दरम्यान एका मैत्रिणीने तिच्या मुली व मुलीच्या दोन मैत्रिणींसाठी ऑनलाईन इंग्लिश स्पाकिंग साठी माझी मदत मागितली. अशा रितीने बघता - बघता आठवड्यातून दोनदा त्यांचीही शिकवणी घातला सुरू केले. ह्या सगळ्या बरोबर माझे फेसबूक च्या .Mohana's Quick Reads पेज वर articles लिहिणे सुरूच होते.
करोनामूळे परीवरिक पातळीवर प्रत्येकाची दिनचर्या अर्थातच थोडी बदलेली होती. घराबाहेर निघण्यात धोका असल्याने आपल्या कुटुंबा सोबत स्वतःच्याच घरात सवयीपेक्षा जास्त वेळ घालवायची अशी वेळ पहिल्यांदाच आली होती. खरे तर मुले लहान असतांना त्यांच्या सोबत आपला जवळपास पूर्ण वेळ जातो. काळा प्रमाणे त्यात बदल घडतात आणि क्वचितच कधीतरी अशा काही कारणाने त्या सारखीच संधी परत समोर येते. इतका वेळ स्वतःच्या कुटुंबासोबत घालवतांना एकमेकांबरोबर नव्याने परत जुळवूनही घ्यावे लागते हे जाणवले. खरे तर ह्या अनुभवांची मला गम्मत वाटू लागली आणि चांगले पण वाटू लागले. मनात म्हटले - निसर्गाने ह्या निमित्ताने घरातीलच नाती परत नव्याने जुळवायला एक साधी दिली.
पारीवरिक पातळीवर जसे बदल होत होते तसेच काही बदल बाहेरच्या जगातही घडतांना दिसत होते. अनेकदा आपण हवामानात होणारे बदल, प्रदूषण, वेगवेगळे जीव जंतू endangered किंवा extinction च्या बातम्या वाचत होतो व त्या संबंधित होणाऱ्या जागतिक गाठ भेटीच्या बातम्या पण वाचायचो. ह्याच व्हायरस च्या निमित्ताने ह्या परिस्थितीतही काही सकारात्मक हालचाली होतांना दिसल्या. कुठे प्राण्यांची नवीन पिल्ले होण्याचे फोटो. हे सगळे पाहून असे वाटते इतकी वर्षे माणूस ह्या गोष्टींबद्दल बोलत तर होता पण स्वतःच्याच नादात आणि वेगात त्याचे प्रयत्न जणूकाही कमी पडत होते. ह्या सगळ्याची जाण जणू निसर्गाला झाली. व्हायरसच निमित्त करून त्याच निसर्गाने आपल्याला सर्वांना इशारा दिला - अरे जरा सावकाश घे!
मोहना पेठकर